बटाट्याची भाजी - एक पद्धत
लागणारा वेळ:
२० मिनिटेलागणारे जिन्नस:
३ मध्यम बटाटे. उकडून, साले काढून फोडी केलेले किंवा न उकडता काचर्या.१ पातीचा कांदा, पातीसह. कांदा फार मोठा नको. पात कोवळी असावी. कांद्यासह बारीक चिरुन घ्यावी.
१ चमचा वाटलेले/किसलेले आले.
१ हिरवी मिरची बारीक चिरुन.
मोहरी, जिरे, बडिशेप - प्रत्येकी १ लहान चमचा. (२ चमचे पंच फोडण चालेल. मेथी-कलौंजी पण येईल, हरकत नाही.)
१ चमचा धणे - खरंगटून. अगदी पूड नको.
अर्धा चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा साखर
१-२ चमचे तेल
१ चमचा लिंबाचा रस.
मीठ
थोडी कोथिंबीर चिरुन.
क्रमवार पाककृती:
पसरट भांड्यात किंवा पॅनमध्ये तेल गरम करुन घ्यावे.
हिंग घालावा.
मोहरी-जिरे-बडिशेप (किंवा पंच फोडण) आणि धणे फोडणीत घालावे.
आले, मिरच्या, हळद घालावी.
आले-मिरच्या थोड्या परतून घ्याव्या.
मग पात आणि कांदा घालून नीट परतावे. पात चांगली परतली गेली पाहिजे.
मग बटाट्याच्या फोडी, मीठ, साखर, लिंबाचा रस घालून वाफ काढावी.
काचर्या असतील तर वाफेवर शिजवाव्यात.
वरुन कोथिंबीर घालून वाढावी.
वाढणी/प्रमाण:
२-३ जणअधिक टिपा:
पातीच्या कांद्याऐवजी ताजी मेथी, कसुरी मेथी, सुका पुदिना, शेपू यातले काहीही चालेल.
ही पद्धत 'नेहमीचीच, वेगळी, नवीन, सोप्पी, यम्मी, नो खस्ता, खस्ता' की कशी ते तुम्ही ठरवा.
माहितीचा स्रोत:
मी. उकडून ठेवलेले बटाटे आणि नुसतेच खाल्ल्यामुळे एकच उरलेला पातीचा कांदा यातून हे तयार झाले.
Comments
Post a Comment